पुण्यात रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे | पुण्यात सिनेअभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाल्यानंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तिला ठार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय विराज पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री आणि विराज यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. विराजने पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असं म्हणत अभिनेत्रीवर पुण्यातल्या मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असं अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलंय.
2023 पासून प्रकरण सुरू
27 ऑगस्ट 2023 पासून 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर आणि मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये सातत्याने बलात्कार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर पीडिताने फोन केल्यानंतर आरोपीने ते फोनसुद्धा उचलणं बंद केलं होतं. माझ्या घरच्यांना का टाळत आहेस? फोन का उचलत नाही, असा प्रश्न विराजला महिलेनं विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसंच त्याच्याकडे असलेलं पिस्तूल तरुणीच्या डोक्यावर ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू जर पोलिसांकडे गेली तर तुला मी दाखवतो कोण आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून पीडित महिला अभिनेत्री आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीचा फायदा विराज पाटील घेत होता. त्यातूनच त्यांची पुढे ओळख वाढत गेली आणि पुढे हा सगळा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही.