रवींद्र धंगेकर यांच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पुण्यातलं राजकारण का तापलंय?
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र आता महापालिकेच्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी रवींद्र धगेकरांनी केलीय. या सर्व वादावरून पुण्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात येणार होते. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करुन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता. शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच टाकीचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी टाकीपाशी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यावर झालेल्या वादावादीत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या जाहीर निषेध सभेलाच रवींद्र धंगेकारांनी काल आक्षेप घेतलाय. महापालिकेच्या आवारात कोणत्याही आंदोलनाला, सभेला परवानगी नसतानाही काल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निषेध सभा घेतली. त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी आयुक्तांकडे केलीय.
रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
“माझ्या कडून जी शिवीगाळ झाली तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि भावना होत्या. मात्र पोलिसांचं जुना प्लॅन आहे. गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि वेळ पडली तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री मोहोदयांकडे करणार. ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असल्याने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत”, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिलीय.
याउलट धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांनी केलेली कारवाई कायदेशीर आणि योग्य असून रवींद्र धंगेकर यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.