उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण, शिंदे सेना अन् राणेंच्या मतदार संघावर लक्ष, वंदे भारतने करणार प्रवास
मुंबई | शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवशी या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती ते तयार करणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नारायण राणे यांच्या मतदार संघावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रीत करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेणार आहे. दौऱ्यात 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्गात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. तर 5 फेब्रुवारीला बारसु येथे भेट देणार आहे. या दिवशी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दौरा संपल्यानंतर वंदे भारत रेल्वेने उद्धव ठाकरे प्रवास करुन पुन्हा मुंबईत येणार आहे.
बारसू रिफायनरीवर स्थानिकांच्या बाजूने
चार आणि पाच फेब्रुवारीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार आहे. यावेळी बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध होत आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण दौऱ्यात बारसू स्थानिकांच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भेटी घेण्याची शक्यता आहे. बारसूमधील काही स्थानिकांची रिफायनरी विरोधी भूमिका असताना स्थानिकांच्या बाजूने उभा असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आले आहे. या दौऱ्या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे घेणार आहे.
विनायक राऊत यांचा प्रचार
सावंतवाडी, कुडाळ, मालवण- आंगणेवाडी भराडी देवी दर्शन घेऊन कणकवली या ठिकाणी 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे दाखल होणार आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारीला बारसु, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार शुभारंभ करत असताना आठ दिवसांत उद्धव ठाकरे या लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात दौऱ्यानंतर सिंधुदुर्ग
एक आणि दोन फेब्रुवारीला रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा केल्यानंतर चार आणि पाच फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. कोकणच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे विशेष लक्ष असेल आणि त्यानुसार निवडणूकच्या दृष्टिकोनातून तयारी केली जातीये.