‘भाजपवाले हरामखोर आहेत’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांची आज चिपळूण येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “लाळ घोटे भाजपसोबत गेलेत. चिपळूणमध्ये धरण फोडणारे खेकडे तिकडे गेलेत. खेकडा तिरकाच चालणार. खेकड्याचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे. इथे भाड्याची माणसं नाहीत. कमळाबाईला आपलं पक्ष संपवायचा होता. 2014 पासून पक्ष फोडत होता. मी पक्षप्रमुख नव्हतो. तर 2014 साली माझ्या पाठिंब्याची सही का घेतली? 2019 पुन्हा युती जोडण्यासाठी मातोश्रीवर का आलात? तो मिंध्ये म्हणतो पक्षप्रमुख आहे. तेव्हा त्याच्याकडे का गेला नाहीत? ज्याचा घराण्याचा संबंध नाही तो आम्हाला घराणेशाही सांगतो. भाजपवाले हरामखोर आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आजचा सोमवार म्हणजे सुट्टीचा दिवस नाही. वेळ साडेपाच वाजलेत. तुम्ही किती वेळेपासून आहात माहीत नाही. पण तुमच्यासाठी आपल्या कुटुंबासोबत संवाद साधायला आलोय. प्रचाराच्या सभेला नाही आलो तरी विजयाच्या सभेसाठी येणार. माझं चिपळूणशी नातं आहे. पण मी कधी म्हणालो नाही मेरा चिपळूणसे बहोत पुराना रिश्ता है. रिश्ता निभानेवाला चाहीये, बतानेवाला नहीं चाहीये”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देशद्रोह्याची जमीन खरेदी केली ती जप्त करून ईडीने तिथे स्वतःचं कार्यालय उघडलं. तिथे काय ईडीने काय शिंपडले ज्याने ते शुद्ध झालं? त्या राजनने काय केलं असं ज्याची चौकशी करत आहात? दरवाज्याची किंमत किती, वस्तूंची किंमत लावली? राजन ते टॉयलेटमध्ये गेले नाहीत. घेऊन गेलं पाहिजे होतं आणि काढा कमोडची किंमत म्हणून सांगायला हवं होतं”, असा टोला ठाकरेंनी लगावला.
‘शिवाजी महाराजांची किंमत लावता… बिनडोक’
“बाळासाहेब ठाकरे बसले त्या खुर्चीची किंमत 10 हजार लावली. जो माणूस ज्या खुर्चीवर बसला त्याने तुम्हाला वाचवलं. त्याची किंमत 10 हजार लावता? शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत 5 हजार लावली. एक निर्बुद्ध माणूस आहे ज्याने मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली, बिनडोक माणसं. शिवाजी महाराजांची किंमत लावता… बिनडोक”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचं प्रेम आलं. सिंधुदुर्गात आले, पाणबुडी प्रकल्प घेऊन गेले. आता शिवनेरीत येणार आहेत. काय घेऊन जाणार काय माहिती? दावोसला खासगी मालमत्ता घेऊन गेले. कपडे म्हणतोय बाकी दुसरं काही नाही. माझ्या मनात पण तसा विचार नाही”, असं ठाकरे म्हणाले.
“आधी सांगितलं अच्छे दिन येणार. आले? 15 लाख देणार होते. आले का? 2 कोटी रोजगार देणार होते. दिले का? पंतप्रधान स्वनिधी म्हणजे पीएम केअर फंड असं समजतो. अरे वसाड्या पीएम फंड म्हणजे काय ते तरी सांग. पीएम केअरचा हिशेब द्या. मग आमच्या राजनच्या घरात जा. अच्छे दिन जनतेचे येणार आहेत, तुमचे येणार नाहीत”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.
‘लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे कमंडल’
“करपुरी ठाकूर यांना भारतरत्न दिलं. त्यावेळी 80 च्या दशकात. भाजप नव्हती. जनसंघ. असेलही भाजप. भाजप असेल नसेल आम्हाला काही फरक पडत नाही. करपुरी ठाकूर यांनी त्यावेळी ओबीसी आरक्षण बाबत निर्णय घेतला. त्यावेळी भाजपने पाठिंबा काढून घेतला होता. मात्र आता त्यांना भारतरत्न दिला. एका बाजूला करपुरी ठाकूर म्हणजे मंडल आणि दुसरीकडे लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे कमंडल”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.