कॅप्टन कसोटी मालिकेला मुकणार? लवकरच होणार बापमाणूस
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पाच सामन्यांची मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. मात्र आता तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीमध्येही तो खेळणार नसल्याची माहिती समजत आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्याचं आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्सने सांगितलं आहे. अशातच आणखी एक कॅप्टनही लवकरच पिता होणार आहे.
कॅप्टन होणार बापमाणूस
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका सुरू असताना दुसरीकडे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 मालिका होणार आहे. मात्र या मालिकेलाा न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन मुकण्याची शक्यता आहे. केन विल्यमसन लवकरच बापमाणूस होणार असल्याची माहिती समजत आहे. केन विल्यमसन याला दोन मुले आहेत.
केन विल्यमसन जबरदस्त फॉर्मात
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये केनने शतके ठोकली आहेत. पहिल्या डावात 118 धावा तर दुसऱ्या डावात 109 धावा केल्या होत्या. या दोन शतकांमुळे केनला कसोटी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला. आयसीसीच्या ताज्या क्रमावारीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये केन विल्यमसन जगातील नंबर वन फलंदाज आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे केन विल्यमसन हा क्रिकेटपासून आत-बाहेर होताना दिसत आहे. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर केन बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. फिट होत जबरदस्त कमबॅक केलं मात्र परत हाताच्या बोटावर बॉल लागल्याने तो बाहेर बसला होता. मात्र आता केन दमदार फॉर्ममध्ये असून संघाला मोठा फायदा होत आहे.