माझ्या शिवसैनिक बंधू, भगिनींनो आणि मातांनो…माजी आमदाराचं अस्वस्थ करणारं पत्र व्हायरल
मुंबई : ठाकरे गटाचे दापोलीतील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. दळवी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्षप्रमुखांचं त्याकडे असलेलं दुर्लक्ष यामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. हा जय महाराष्ट्र करताना सूर्यकांत दळवी यांनी शिवसैनिकांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी पक्षातील राजकारण, कुरघोडी आणि त्यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण या सर्वांचा ऊहापोह केला आहे. तसेच पक्षप्रमुखांच्या अनास्थेवरही त्यांनी पत्रातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सूर्यकांत दळवी यांचं पत्र जसेच्या तसं…
माझ्या दापोली मतदारसंघातील शिवसैनिक बंधू, भगिनींनो आणि मातांनो,
आपणांस जाहीर साष्टांग नमस्कार आणि जय महाराष्ट्र!
आज भी माझ्या आयुष्यातील एक राजकीय कठोर निर्णय घेत असून माझ्याबाबत होत असलेल्या गलिच्छ राजकारणामुळे नाईलाजाने मला तो प्यावा लागत आहे. मी आमदार म्हणून दापोलीसारख्या पवित्र मतदार संघात आपणा सर्वाच्या आशीर्वाद आणि साथीने केलेल्या 25 वर्षाच्या कार्याचा आढावा आणि लेखाजोखा आपल्या समोर मांडत आहे.
मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 9185 मध्ये कोकणातील शिवसैनिकांनो आपल्या गावाकडे वळा अशी हिंदुत्वाच्या विचारांची हाक दिल्यावर आम्ही मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक जुन्या सहकारी शिवसैनिकांनी दापोलीचे शिवसैनिक एकसंघ करून एक प्रदीर्घ चळवळ उभी केली. दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे वादळ निर्माण केले. कोणताही भेदभाव न ठेवता समाजातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत आणि घराघरात शिवसेना आणि शिवसेनेचे विचार पोहचविण्याचे काम केले. हे करीत असताना जातपात न मानता मतदार संघातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन दापोली मतदारसंघ शिवसेनामय केला. शिवसेनाप्रमुखांचे पवित्र हिंदुत्वाचे विचार दापोली तालुक्यातील दुर्गम भागात पोहचविण्याचे अवघड काम आम्ही केले.
1990 सालामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यावर स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे तिकीट मला घोषित करून त्यांनी प्रचाराचे पहिले रणशिंग स्वतः दापोलीत येऊन फुंकले. मला माझ्या प्राणप्रिय दापोलीच्या जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. हे सारे श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिक यांचेकडे जाते. हे माझ्या आयुष्यातील मोठे भाग्य आहे. तद्नंतर सलग 25 वर्ष दापोलीच्या राजकीय पटलावर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. 25 वर्षाच्या काळात दापोलीच्या सुसंस्कृत मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचे अविरत भाग्य मला मिळाले. शिवसेना व हिंदुत्व हे ज्वलंत विचार दापोलीच्या तरुण पिढीच्या हृदयात समर्पित करण्याचे पवित्र कार्य माझ्या हातून घडले, यासाठी मी मा. शिवसेनाप्रमुखांचा शतशः ऋणी आहे.
दापोलीसारख्या पवित्र मतदारसंघात कार्य करीत असताना शिवसेनेवर आलेल्या अनेक संकटावर आम्ही मात करून दापोलीची शिवसेना आजपर्यंत अबाधित ठेवली आहे. याचं सारे श्रेय दापोलीच्या निष्ठावंत शिवसैनिकांना जाते. 2014मध्ये दापोली मतदारसंघामध्ये स्वकीयांनी केलेल्या विश्वासघातामुळे निवडणुकीत माझा प्रथमच पराभव झाला. पराभव हा आपल्या काही स्वकीय नेत्यांनी राजकीय स्वार्थापोटी घडवून आणला होता हे कालांतराने उघड झाले. पराभवानंतरसुद्धा संपूर्ण मतदारसंघात लक्ष घालून, जनसामान्य मतदारांचे प्रश्न सोडवित, जनतेचे आभार मानून आणि पुन्हा सक्रिय होऊन शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. परंतु दापोली मतदारसंघात फुटीची बीजे पेरुन काही विघ्नसंतोषी लोकांनी संघटनेची घडी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.
दापोली नगरपंचायत शिवपुतळा उद्घाटन सोहळयावेळी ते स्पष्ट झाले. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मतदारसंघातील ठराविक लोकांना हाताशी धरून शिवसेनेत फुटीची बीजे पेरली आणि त्याचीच परिणीती शिवसेना फुटण्यामध्ये झाली. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला सावध करण्याचा प्रयत्न माझ्याकडून आणि माझे सहकारी यांच्याकडून झाला. परंतु त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. तरीही दापोलीची शिवसेना कायम ठेवण्याचे काम आम्ही सर्व शिवसैनिकांनी केले.
सध्या आपल्याच पक्षातील काही नेते त्यांची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारसंघात जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करून ‘मी म्हणजेच शिवसेना’ अशा पद्धतीने पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधण्याचे कार्य करीत आहेत. मी अनेक वेळा कार्यकर्ते आणि विभागीय नेत्यांना घेऊन सन्माननीय पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पक्षविरोधी होत असलेलं काम पोहचविण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा पक्षप्रमुखांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
दापोली मतदारसंघ शिवसैनिकांना सोबत घेऊन एकसंघ ठेवण्याचे कार्य करीत आलो आहे. ज्यांना पक्षाने वेळोवेळी झुकते माप दिले, त्यांनीच दापोलीचे पर्यावरण बिघडविण्याचे काम सातत्याने केले. त्यांना वेळोवेळी रोखण्याचे काम माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी केले होते. परंतु सध्या संघटनेमध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जातीयवादाचे विष पसरवून सतत डावलण्याचे काम केले जात आहे. संघटनेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. उदाहरणार्थ मा. शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचा खेड येथील खळा बैठकीचा कार्यक्रम. आतापर्यंत संघटनेमध्ये काम करीत असताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात होते. परंतु हल्ली उमेदवार निवडीसारखा निर्णय घेताना सुद्धा जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे हे मनाला निश्चितच क्लेश देणारे आहे. कोकणात 30 वर्षापूर्वी मुंबईकरांना संघटीत करून शिवसेना ग्रामीण भागात वाढविण्याचे काम केले. शिवसेना मुंबई आणि ग्रामीण कार्यकारिणी यांच्या समन्वयातून दापोली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. सध्या मुंबई आणि ग्रामीण कार्यकारिणी समन्वयाने काम करीत असताना सुद्धा त्यांच्यात जातीयवाद निर्माण करून फूट पाडण्याचे काम सुरु आहे. मुंबई आणि ग्रामीण भागात होणाऱ्या संघटनात्मक कार्यक्रमांचे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना निमंत्रण न देणे, कार्यकत्यांमध्ये गटबाजी करून त्यांचे खच्चीकरण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधणे अशा प्रकारचे पक्षसंघटना वाढीसाठी बाधा आणणारे काम काहीजण करीत आहेत.
वास्तविक पक्ष फुटीनंतर सर्व जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणीसाठी, माझ्या आतापर्यतच्या अनुभवावा आणि संघटन कौशल्याचा उपयोग करून घेऊन संघटना वाढीसाठी बळ देणे अपेक्षित असताना, माझ्या निष्ठेबाबत सतत वावड्या उठवून मला महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेमधून बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पक्षसंघटनेत अनेकांना, मंत्रीपदे, नेते, असे, संपर्कप्रमुख अशी पदे दिली गेली. त्यातीलही काही नेते पक्ष सोडून गेले. परंतु पक्षात निष्ठावंत असणाऱ्या नेतृत्त्वाची सतत उपेक्षा करण्यात आली.
सबब, या सर्व कृत्यास कंटाळून मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना साथ देणारा पक्ष म्हणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय.
माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात दापोली मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावण्यात मी यशस्वी झालो, असे असले तरी काळानुसार मतदार संघातील नागरिक यांच्या नवीन गरजा निर्माण होत असताना दापोली मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार, महिला यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प आणणे, हर्णे, दाभोळ जेटीचा प्रश्न मार्गी लावणे, सागरी महामार्गाचे काम पूर्ण करणे, यासारखे धोरणात्मक अनेक विकास प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. आणि अशी विकासकामे पूर्ण व्हायची असतील तर केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वय असल्याशिवाय शक्य नाही. गेल्या दहा वर्षात देशभरात होत असलेल्या विकासात्मक कामातून ते मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दाखवून दिले आहे. आपल्या दापोली मतदारसंघाचा विकास केवळ राजकारणामुळे खंडीत झाला आहे. त्याला चालना मिळायची असेल तर केवळ विरोधाला विरोध न करता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासात्मक योजनांचा प्रभावीपणे वापर करून मतदार संघाचा विकास करता येणे शक्य आहे असे मला वाटते.
दापोली मतदार संघातील विकासासाठी व देणाऱ्या काळात आपल्या सर्व सहकार्याना सामाजिक, राजकीय कामात बळ देण्यासाठी मी माझ्या सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांना माझी भूमिका स्पष्ट करून त्यांचे आशीर्वाद आणि साथ घेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करीत आहे.
आपली साथ आणि आशीर्वाद सदैव सोबत राहो हीच विनंती
आपलाच,
सूर्यकांत शिवराम दळवी