महाराष्ट्र ग्रामीण

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, छत्रपती गादीचे वंशज महाविकास आघाडीत गेल्यास उमेदवारी मिळणार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. असं असताना आता महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी खरी ठरली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण ही बातमीच अगदी तशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत खूप मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. सूत्रांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी एक अट असणार आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. संभाजीराजेंनी 3 पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाजीराजेंना सोबत घेण्याबाबत मविआत एकमत

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्याबाबत एकमत झालेलं आहे. पण महाविकास आघाडीने यासाठी संभाजीराजे यांच्यापुढे ठेवलेली अट मोठी आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीच्या ऑफरवर काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे यांनी स्वत:चा स्वराज्य म्हणून पक्ष स्थापन केला आहे. त्यांचा स्वत:चा स्वराज्य पक्ष आहे. तसेच ते यापूर्वीदेखील राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी दीड वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटी संभाजीराजे यांनी मान्य केल्या नव्हत्या.

संभाजीराजेंना आपला पक्ष विलीन करावा लागणार?

संभाजीराजे यांनी आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात, ठाकरे गटात किंवा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आणि त्यांचा स्वराज्य पक्ष त्या पक्षात विलीन केला तर त्यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचदेखील याबाबत एकमत झालेलं आहे. संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा दिली जाऊ शकते, अशीदेखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचंदेखील नाव यासाठी चर्चेत होतं. त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी चर्चेत होतं. त्यानंतर आता संभाजीराजे यांच्याबाबतची नवी माहिती समोर आली आहे. संभाजीराजे याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button