महाराष्ट्र ग्रामीण

पंतप्रधान मोदी यांनी ‘तो’ निर्णय घेतला अन् माझ्या पायाखालची वाळूच सरकली; मुख्यमंत्री मोहन यादव यांचं मोठं विधान

नवी दिल्ली : नोटबंदीची घोषणा कोणता पंतप्रधान करू शकतो का? लॉकडाऊनची घोषणा तरी कोणता पंतप्रधान करेल का? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आले. त्यानी घोषणा केली. मोदींनी जेव्हा घोषणा केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अनेक पंतप्रधान अधिकाऱ्यांच्या मार्फत अशा घोषणा करतात. आपल्यावर काही येऊ नये यामागची ती भावना असते. पण मोदी यापेक्षा वेगळे आहेत. त्यांनी स्वत: जबाबदारी घेतली. आपल्या लोकांना नंतर सुरक्षित करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात होता. त्यांची काम करण्याची ही पद्धत आहे, असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आज दिल्लीत सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री मोहन यादव बोलत होते.

मंत्र्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे हा शब्द खटकतोय. त्याच्या उलट सांगतो. मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला धन्यवाद देत आहे, त्यांनी आमच्या मंत्र्यांना प्रशिक्षण दिलं. लोकशाहीत आपण सरकार बनवतो. अनेक विभाग असतात. त्यात आपण कुणालाही उचलून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद देतो. पण ज्यांना अध्यक्ष करतो त्यांना काहीच ट्रेनिंग दिली जात नाही. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला ट्रेनिंग मिळते. पण मंत्र्यांना ट्रेनिंग मिळत नाही. त्यांना कार्यासाठी दक्ष करता आलं पाहिजे. मी स्वत: अनुभव घेतला आहे. मी अनेक संस्थाचा मेंबर होतो. पण जेव्हा एका प्राधिकरणाचा अध्यक्ष झालो. तेव्हा मला काही अनुभव नव्हता. माझ्या आधीही अनेक अध्यक्ष झाले. जेव्हा आपण अध्यक्ष होतो, तेव्हा प्रशिक्षण नसेल तर अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतो. तेव्हा अधिकारी आपल्याशी कसे वागतात हे तुम्हाला कळलं असेलच. त्यामुळेच अशा ट्रेनिंगची गरज असते, असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं.

तरीही आम्ही परीक्षा घेतली

कोव्हिडच्या काळात आम्ही भरपूर काम केलं. अनेक राज्यांनी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोशन देण्याची घोषणा केली होती. परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आम्ही परीक्षा घेतली. घरी बसून ओपन बुक परीक्षा झाली तरी चालेल पण विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय लागली पाहिजे, असं आमचं म्हणणं होतं. अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. पण आम्ही निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं.

लक्ष्य आकाशापेक्षाही उंच

आमच्या मंत्रिमंडळात अनेक जण पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. काही लोक केंद्रीय मंत्री होते. तेही आमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. काहींना प्रशासकीय कामांचा अनुभव होता, काहींना नव्हता. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण घ्यायला सांगितलं. त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आणून त्यांचं प्रशिक्षण घेतलं. मीही दोन दिवस तिथे राहिलो होतो. आपण शिक्षण घेतलं, पण प्रशिक्षण वारंवार झालं पाहिजे, असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचं लक्ष्य आकाशापेक्षाही उंच आहे. पण आमचं उत्तरदायित्व मोठं आहे. मध्यप्रदेश सरकारने सर्व क्षेत्रात काम करावं असं आमचं मत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button