साहित्यरत्नास आगळेवेगळे अभिवादन, अवकाशातील ताऱ्याला मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव
1 ऑगस्ट रोजी जयंतीदिनी अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन त्यांचे चिरंजीव सचिन साठे व सून सावित्रीबाई यांना रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर : सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळाले असून यंदा अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणारा आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले आहे. मागील सहा महिन्यांपासून ते यासाठी अथक प्रयत्न घेत होते. त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली. त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. संपूर्ण जगाला माहिती व्हावी की, अण्णाभाऊ साठे कोण होते, त्यांचे कार्य किती महान होते, या उद्देशाने ताऱ्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले, असे ते म्हणतात.ऑगस्ट रोजी जयंतीदिनी अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन त्यांचे चिरंजीव सचिन साठे व सून सावित्रीबाई यांना रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर विविध ठिकाणी जाऊन समाजबांधवांना हे प्रमाणपत्र दाखवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले जाईल, असे सुशील तुपे यांनी सांगितले.
१ ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे. यासाठी मोबाइल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून तुम्ही तो बघू शकता. तसेच ‘द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड आयओएस वरून देखील हा तारा बघता येईल,’ अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली.