निष्ठावंत शिवसैनिकांचा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न निषेधार्थ :सत्यजितसिंह पाटणकर
मलिदा गॅंगवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी
पाटण दि. २८ ( प्रतिनिधी ) पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामात निकृष्ट दर्जाची कामं, टक्केवारी, कमिशन यातून मलिदा गॅंगचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी लोकशाही मार्गाने शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मोर्चा काढला. त्याचवेळी देसाई गटाचे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांनी नव्हे तर या निकृष्ट कामांसाठी जबाबदार असलेल्या मलिदा गॅंगच्या ठेकेदारांनी प्रतिमोर्चा काढून हा मोर्चा मोडीत काढण्याचा निंदनीय प्रयत्न केल्याचा आरोप हर्षद कदम यांनी केला. यावेळी वाहनं, माईकची तोडफोड असे निंदनीय प्रकार झाले. लोकशाही मार्गाने केलेल्या अशा प्रयत्नांचे स्वागत होण्याऐवजी ज्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर आपण आमदार झालो दुर्दैवाने त्याच मूळच्या शिवसैनिकांना ठेकेदारांच्या माध्यमातून ठेचून काढण्याचा हा केविलवाणा प्रयत्न पाटण मतदारसंघातील जनता कदापिही सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका पत्रकार द्वारे प्रसिद्धी दिला.
या पत्रकात सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुढे म्हटले आहे की, एकेकाळी संस्कार, विचार, आदर्शांचा हा मतदारसंघ होता, त्यावेळी याच ना. देसाईंनी अनेकदा शासन, प्रशासनाच्या विरोधात मोर्चे, आंदोलने केली त्यावेळी त्याचे स्वागत लोकशाही मार्गानेच झाले होते. मात्र ज्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या सहकार्यातून, घामातून ना. देसाईंना विजयी केले व ते मंत्री झाले दुर्दैवाने त्याच निष्ठावंतांना अशाप्रकारे पोलीस इतर प्रशासनावर दबाव टाकून त्यांचे लोकशाहीतून मिळालेले हक्क, अधिकार यांच्यावर गंडांतर आणत असतील तर अशा घटना निंदनीय व निषेधात्मक आहेत. आपला मतदारसंघ आता पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या हातात न राहता तो ठेकेदार मलिदा गॅंगच्या हातात गेला ही अतिशय संताप व खेदजनक बाब आहे. मतदारसंघ अशा विखारी व विषारी मलिदा गॅंगच्या ताब्यात गेल्याने सामान्य मतदारच नव्हे तर अगदी देसाई गटातील निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या दृष्टीनेही ही अतिशय धोक्याची घंटा आहे. या पाच वर्षात स्थानिक ग्रामपंचायत, सोसायटी ते अगदी बाजार समितीच्या निवडणुकीतही या मलिदा गॅंगच्या माध्यमातून धनशक्तीच्या जोरावर विरोधकच नव्हे तर स्वतःच्या गटातील प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून आपली दहशत माजवत आघोरी हुकुमशाही राबवली जात आहे.