आंबेडकरी चळवळीचा पँथर विजय वाकोडे यांचे निधन
सायंकाळी ४ वाजता राहुल नगर येथून अंत्ययात्रा निघणार
आंबेडकरी चळवळीचा पँथर विजय वाकोडे यांचे निधन
सायंकाळी ४ वाजता राहुल नगर येथून अंत्ययात्रा निघणार
परभणी (प्रतिनिधी गजानन साबळे) जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात दलित चळवळीचे प्रमुख नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष पँथर विजय वाकोडे यांचे सोमवार १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवार दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान परभणी शहरातील राहुल नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणार असून खंडोबा बाजार येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व असलेल्या विजय वाकोडे यांनी गेल्या ४० वर्षापासून मागासवर्गीय वंचित समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली होती. तसेच ते आंबेडकरी महाविद्यालयीन चळवळीत जीवनापासून सक्रीय झाले होते. सुरुवातीला दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चळवळीच्या कामाला सुरूवात केली होती. मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतरण लढ्यातील लाँगमार्च पासून ते सध्या सुरू असलेल्या परभणीतील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना घटनेनंतर झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी होते. अनेक प्रकारच्या आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात अन्यायाविरुध्द लढा देण्याचे काम केले होते. सध्या ते रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
काल दिवसभर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी ते रस्त्यावर होते. रात्री अचानक
त्यांना अस्वस्थता जाणवत असल्याने तात्काळ परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची -हदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.
मंगळवार १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान परभणी शहरातील राहुल नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या मैदानावर त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांची अंतिम यात्रा परभणी शहरातील राहुल नगर येथून निघणार आहे. ही अंत्ययात्रा गौतम नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, शनिवार बाजार, अपना कॉर्नर मार्गे खंडोबा बाजार येथील स्मशानभुमीकडे जाणार असून याच स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.