अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीकविमा २ डिसेंबरपासून मिळणार
जिल्हाधिकारी गावडे यांची माहिती, आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया सुरू
अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीकविमा २ डिसेंबरपासून मिळणार
जिल्हाधिकारी गावडे यांची माहिती, आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया सुरू
पूर्ण: सप्टेंबरमध्ये
झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान व पीकविम्याची अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात म्हणजेच २ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. निवडणुकीपूर्वीच अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. आता आचारसंहिता संपल्याने २ तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन खरिपातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी १३६०० रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर केले होते. त्यासाठीचा निधी जिल्हा
प्रशासनास निवडणुकीपूर्वीच प्राप्त झाला होता. जिल्हा व तहसील महसूल प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या विशिष्ट क्रमांक (वी. के. नंबर) च्या याद्या ज्या-त्या सज्जांच्या तलाठ्यांनी विधानसभा निवडणुकीची आच- ारसंहिता लागण्यापूर्वीच प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावरून संबंधित शेतकऱ्यांनी महा ईसेवा केंद्र अथवा अधिकृत सीएससी केंद्रावर जाऊन
अंगठा लावत ई-केवायसी केली होती. परंतु यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यामळे अतिवृष्टीचे अनुदान खात्यात वर्ग करण्याचे काम रखडले होते. निवडणुकीची आचारसंहिता २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली तरीही अद्याप केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा न झाल्याने शेतकरी विचारणा करीत होते. या संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याची संपर्क साधला असता त्यांनी पुढील आठवड्यात म्हणजेच २ डिसेंबरपासून अतिवृष्टी अनुदान व २५ टक्के अग्रिम पीकविमा भरपाई जमा होण्याची सुरुवात होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे रक्कम खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.