राहुल गांधी परभणीत; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे केले सांत्वन.
सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खा. राहुल गांधी यांच्याकडे केली.
परभणी :- (प्रतिनिधी गजानन साबळे) लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे २.३० वाजेच्या सुमारास परभणी शहरात दाखल झाले. त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खा. राहुल गांधी यांच्याकडे केली.
परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर शहर व जिल्ह्यात मोठ्या आंदोलन झाले. या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी हा देखील होता. सोमनाथला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी शहरात दाखल झाले. त्यानंतर २.३० वाजेच्या सुमारास त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चंनिथल्ला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदींचे उपस्थिती होती.