राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हाती पाच महत्वाच्या खात्यांचा कारभार
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हाती पाच महत्वाच्या खात्यांचा कारभार
परभणी
जिल्ह्याला यंदाच्या मंत्रीमंडळात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. सुमारे • दहा वर्षांनंतर ही मंत्रिपदाची संधी जिल्ह्यासाठी चालून आली. शनिवारी रात्री राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे एकूण पाच खात्यांचा कार्यभार असल्याचे समोर आले आहे. त्यांना ग्रामीण विकासासह सामान्यांच्या सेवेची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
…या खात्यांचा आहे समावेश
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) अशा पाच प्रमुख खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.
जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. यापूर्वी दहा वर्षे इतर जिल्ह्यातील मंत्र्यांवरच जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अवलंबून होता. त्यापूर्वी जिल्ह्यातून आजपर्यंत माजी मंत्री म्हणून सखाराम नखाते, रावसाहेब जामकर, माणिकराव भांबळे, गणेशराव
दुधगावकर, सुरेश वरपूडकर आणि फौजिया खान यांना संधी मिळाली होती. दहा वर्षांत जिल्ह्यातील कोणालाही मंत्री होण्याची संधी मिळाली नाही. महायुती सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या घोषणेमध्ये पहिल्यांदाच जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची वर्णी लागली. त्यामुळे जिल्ह्यात मंत्रिपदाचा अनुशेष त्यांच्या रूपाने भरून निघाला. मंत्रीमंडळात वाटप करण्यात आलेल्या खात्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी त्यांना मिळणार आहे. सर्वसामान्य लोकांशी निगडित असलेल्या पाच प्रमुख खात्यांच्या त्या राज्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. यामुळे कार्यकर्ते देखील आनंदात आहेत