द्वारका (नाशिक) उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार; १३ जखमी
द्वारका (नाशिक) उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार; १३ जखमी
सळयांच्या ट्रकवर पाठीमागून आदळला टेम्पो; मृतांत पिता-पुत्राचा समावेश
दिंडोरि तालुका(प्रतिनिधी):मेहमुद आर.मन्सूरी
निफाड तालुक्यातील धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून सिडकोकडे परतताना द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपुलावर पुरुष भाविकांचा टेम्पो पाठीमागून लोखंडी सळ्यांच्या ट्रकवर (एम.एच २५ यू ०५०८) जाऊन आदळला. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले असून, यामध्ये संतोष व अतुल मंडलिक या बापलेकाचाही समावेश आहे. तेरा भाविक गंभीररीत्या जखमी झाले आहे. ही दुर्घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मयत झालेले पाचही लोक सिडकोमधील रहिवासी होते.
नाशिक शहरातील सिडको सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले गंभिरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम (कारण) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी परिसरातील महिला व पुरुष हे दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास करून नैताळेगावाच्या पुढे असलेल्या धारणगाव येथील धार्मिकस्थळी गेले होते.
सायंकाळी कार्यक्रम आटोपून परतीचा प्रवास करताना अगोदर महिला भाविकांना घेऊन टेम्पो नाशिकच्या दिशेने रवाना झाला. हा टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहोचून काही वेळ होत नाही, तोच पुरुषांच्या टेम्पोला (एम. एच१५ एफ. व्ही ५६०१) द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचा चक्काचूर झाला. कॅबिनमध्ये लोखंडी सळ्या शिरल्या. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस, अग्निशमन दलाचा बंब, १०८च्या तीन रुग्णवाहिकांसह काही खासगी रुग्णवाहिका वेगाने घटनास्थळी पोहोचल्या. आपत्कालीन बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. काही जखमींना लेखानगरच्या खासगी रुग्णालयात, तर काहींना शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मृतांची नावे : १) अतुल संतोष मंडलिक (२२), २) संतोष मंडलिक (५६), ३) यश खरात, ४) दर्शन घरटे, ५) चेतन पवार (१७
जखमींची नावे : १) सार्थक (लकी) सोनवणे, २) प्रेम मोरे, ३) राहुल साबळे, ४) विद्यानंद कांबळे, ५) समीर गवई, ६) अरमान खान, ७) अनुज घरटे, ८) साई काळे, ९) मकरंद आहेर, १०) कृष्णा भगत, ११) शुभम डंगरे, १२) अभिषेक, १३) लोकेश (दोघांची पूर्ण नावे समजू शकलेली नाहीत.)