वाशिमच्या वैभवच्या कामाची ब्रिटिश काऊंसिल कडून दखल..
वैभवच्या कामाची माहिती दिल्लीच्या प्रदर्शनात .
वाशिमच्या वैभवच्या कामाची ब्रिटिश काऊंसिल कडून दखल..
वैभवच्या कामाची माहिती दिल्लीच्या प्रदर्शनात
जून २०२३ मध्ये ब्रिटिश सरकारच्या महत्चाच्या दोन्ही स्कॉलरशिप मिळवून वाशीम जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणाऱ्या वैभव सोनोने याने पुन्हा एकदा वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेडगाव या छोट्याश्या गावातील श्री. गणेश आणि सौ. विमल सोनोने यांचा मुलगा वैभव जून २०२३ मध्ये चेवनिंग आणि कॉमनवेल्थ स्कॉलरशिप मिळवून इंग्लंड देशात शिकायला गेला होता. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्याने शिक्षण पूर्ण करून हा पल्ला गाठला असल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले गेले. इंग्लंडमध्ये शिकत असतांना देखील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि सेमिनारला त्याने हजेरी लावली. ब्रिटनच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघात लीड्स विद्यापीठाचा प्रतिनिधी होण्याचा मान देखील त्याला मिळाला. तसेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि तत्कालीन FCDO चे सचिव डेव्हिड कॅमरून यांना भेटण्याची तसेच ब्रिटिश संसदेत आपले विचार मांडण्याची संधी देखील वैभवला मिळाली होती. पर्यावरण आणि विकास हा विषय घेवून वैभवने लीड्स विद्यापीठात गुणवत्ता यादीत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. ऑक्टोबर महिन्यात वैभव मायदेशी परतला आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील त्याच्या कामावर रुजू झाला. त्याने साल २०१८ पासून मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपानी या गावात केलेल्या कामाची दखल आता ब्रिटिश काऊंसिल ऑफ इंडिया कडून घेण्यात आली आहे.
कॉमनवेल्थ स्कॉलरशिपला यंदा ६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रिटिश काऊंसिल ऑफ इंडिया यांच्याकडून भारतातील कॉमनवेल्थ स्कॉलर्स कडून त्यांच्या कामाची माहिती देणारे पोस्टर्स मागवण्यात आले होते. आलेल्या पोस्टर्स मधून सर्वोत्तम अशा ११ पोस्टर्सची निवड ज्युरींनी केली आणि त्या पोस्टरला सध्या ब्रिटिश काऊंसिल ऑफ इंडियाच्या दिल्ली कार्यालयात प्रदर्शनास ठेवले आहे. या प्रदर्शनात वैभव सोनोने याच्या कामाच्या पोस्टरचा देखील समावेश असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वैभव सोनोने याने अझीम प्रेमजी विद्यापीठातून पदयुत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्रदान संस्थेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील मंडला या आदिवासी बहुल जिल्ह्यातील धमनपानी या गावात कामाला सुरवात केली होती. धमनपानी गावात त्यांच्यावर दोनवेळा हल्ले होवून देखील वैभवने गावातील महिला-पुरुष यांच्यासोबत विकासाच्या दृष्टीने काम सुरूच ठेवले. धमनपानी गावात रस्ता नव्हता, कामाच्या शोधात जवळपास ९०% कुटुंब बाहेर राज्यात स्थलांतर करत असत आणि गावातील ९५% पेक्षा अधिक महिला ह्या एनिमिक आणि ५०% पेक्षा अधिक बालके कुपोषित होती. अशा गावात नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन पद्धती, रोजगार हमी योजनेची काटकोर अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षमतावर्धन आणि गावकऱ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करत वैभव यांनी गावाचा कायापालट केला आहे. मागच्या ५ वर्षातील कामाचे परिणाम म्हणजे गावातील स्थलांतर १०-१५% वर आले आहे तसेच कुपोषण ३०-४०% कमी झाले आहे. ज्या गावात जानेवारी ते जून पिण्याच्या पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर वणवण भटकावे लागत होते त्या गावात आता बारा महिने पिण्याचे पाणी उपलब्ध आहे आणि रब्बी मौसमात देखील शेती केली जात आहे. ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांचा सहभाग १००% वाढला आहे आणि रोजगार हमी योजनेसारख्या शासकीय योजना भ्रष्टाचारमुक्त झाल्या आहेत.
वरील कामाबद्दल ब्रिटिश काऊंसिलने त्याचा केलेला सन्मान धमनपानी गावातील लोकांसमवेत वाशिमकरांसाठी देखील अभिमानाचा क्षण आहे. जलसंवर्धनाचे काम केल्यानंतर आता परंपरागत आणि आधुनिक शेतीच सांगड घालून, रासायनिक खते आणि औषधांचा वापर बंद करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल यावर वैभव काम करतो आहे. वैभव त्याच्या कामाचे श्रेय धमनपानीतील महिला आणि त्याचे सहकारी सुरेंद्र सोनवाणी यांना देतो.
हे पोस्टर दिनांक १६ डिसेंबर पासून ब्रिटिश काऊंसिल ऑफ इंडियाच्या दिल्ली कार्यलयात ठेवले असून अनेक विद्यार्थी आणि इच्छुक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत. दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल तेव्हा दिल्लीमध्ये असणारे विद्यार्थी आणि इच्छुक या प्रदर्शनाला तसेच या निमित्ताने ब्रिटिश काऊंसिल ऑफ इंडियालाच्या कार्यालयाला भेट देवू शकतात.