‘रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या’, संजय राऊत यांचा मोठा आरोप
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर मोठा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायक यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबतचा खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्या पाठीमागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीतील जमिनीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने त्यांची आधी चौकशी देखील केली आहे. पण आता संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा
महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये नेहमी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतात. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली होती. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचीदेखील कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी झाली होती. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना कथित खिडची घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती.