मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 85 उमेदवार रूजू
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना आपल्याकडील मंजूर पदाच्या पाच टक्के एवढे प्रशिक्षणार्थी घेता येणार
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 85 उमेदवार रूजू
अकोला, दि. 9 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात विविध आस्थापनांसाठी 428 उमेदवारांची निवड होऊन त्यात 85 उमेदवार रूजू झाले आहेत. आस्थापनांच्या मागणीनुसार उमेदवार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे, अशी माहिती रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता सहायक संचालक प्रफुल्ल शेळके यांनी दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना आपल्याकडील मंजूर पदाच्या पाच टक्के एवढे प्रशिक्षणार्थी घेता येणार आहेत. खाजगी क्षेत्रातील उद्योजक, आस्थापना यांनादेखील सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के व इतर क्षेत्रांसाठी 10 टक्के एवढे उमेदवार घेता येणार आहेत. योजनेची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी होत असून, शासकीय आस्थापनांकडून 1 हजार 220 पदे अधिसूचित झाली आहेत. त्याला अनुसरून आतापर्यंत 428 उमेदवारांची निवड होऊन 85 उमेदवार रुजु झालेले आहेत. आस्थापना व युवकांचा चांगला प्रतिसाद असून, आतापर्यंत या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातील 1 हजार 744 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणार्थी जागेसाठी अर्ज करावा व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शेळके यांनी केले.
#मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षणयोजना_अकोलाजिल्हा
०००